बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

खेळ दैवाचा....


कसा प्रसंग हा येतो पहा तो,
कधी कुणाच्या आयुष्यामध्ये |
जिथल्या तिथे थांबते सारे,
चालले होते जे वेगामध्ये |

कुणास मिळता हा पुर्णविराम तो,
अल्पविराम कुणास त्या मिळूनी जातो |
कुणाची सोडूनी साथ कुणीतरी,
एकांत कुणास त्या देऊनी जातो |

आपण म्हणतो जरी त्यास त्या क्षणी,
आम्ही आहोत ना तुझ्या सोबती |
सोबत असते ती परी.. क्षणभराची,
अथांग उरल्या त्या जन्मातली |

क्षण सरता तो जलद गतीने,
पाऊले मागे का..? अडखळती |
कुणास आठवूनी कुणी असे का..?
वळणावर एका त्या घुटमळती |

घुटमळणारे मन ते सोडूनी,
जावेच लागते तिला पुढे |
काळा सोबत जर.. पाउले चालती तर..,
चालावेच लागते ना तिला..? त्यांच्यासवे |

चालता-चालता मग पाउले थकली तर,
आधार हातांचा तिला कुणाच्या मिळे |
कुणी दिला हात जरी आधार म्हणुनी तरी,
झेपावेल मन का तिचे..? त्या कुणाच्या कडे |

असे काही सुचवूनी गेले मन रडवूनी,
प्रश्न मनात ह्या माझ्या एकच उरे |
देव खेळ खेळी का हा..? दोघा एक करी का हा..?
न्यावे लागे जर त्याला कुणा एकाला सवे |हर्षद अ. प्रभुदेसाई..........

सोमवार, २ मे, २०११

खेळ काळाचा....

थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल...
की... आपलं हे आयुष्य फक्त,
तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं ।
जसं भूत आणि भविष्यामध्ये,
हे वर्तमान घुसमटत असतं ।

ह्या तिघांमध्ये चालू असतो एक अजबच खेळ...
वर्तमान धावत असतो जणू,
भविष्यास त्या गाठण्यासाठी ।
पण भूत अडवून धरतो त्यास...,
भविष्यात त्याने ह्याला विसरू नये ह्यासाठी ।

पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ...
वर्तमान जातो थकून,
धावता-धावता त्या भाविष्याकडे ।
मग भूत येऊन म्हणतो त्यास...,
थकला असशील तर.. येउन जा थोडावेळ माझ्याकडे ।

आयुष्यभर असाच खेळला जात असतो हा खेळ...
वर्तमान गाठतोय.. तोवर ते भविष्य,
बरंच लांब निघून गेलेलं असतं ।
आणि पाठीमागे राहिल्या त्या भूताचं मात्र,
दिवसेंदिवस वय हे... वाढतच असतं ।

थोडक्यात काय.. ह्या तिघांमधला व कधीही न संपणारा असतो हा खेळ...
कारण.. त्या भविष्यास ह्या वर्तमानाला,
काही केल्या गाठता येत नाही ।
कितीही थकला तरी वर्तमान काही,
त्याच्या मागे धावणं थांबवत नाही ।
आणि भूतदेखील वर्तमानाची पाठही कधीच,
सहजा-सहजी तरी सोडत नाही ।


ह्या सार्‍यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का?...
हे तिघे तीन नाहीत, हा तो एकच आहे ।
वर्तमानात असलेला तोच, त्या भविष्यात येणारा एक वर्तमान आहे ।
आणि ओलांडून गेल्यावर भविष्यास, मागे उरला तोच तो भूत आहे ।
म्हणजेच.. ह्या तिनही भूमिका बजावणारा, एकमेव तो काळ आहे ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

एक संध्याकाळ अशी....

हा माझा मित्रपरिवार....
तुमच्या मनात आलं असेल की ह्या कवितेसोबत मी हा फोटो का टाकला..?
कारण.."एक संध्याकाळ अशी...."ही कविता मला ह्यांच्या सोबत घालवलेल्या काही क्षणांमुळे सुचली...
ती संध्याकाळ आम्ही खूप मजेत घालवली.
मी तसा गप्पच होतो,कारण मला खरंच काही सुचत नव्हतं.
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्यातले ते हास्य-विनोद,हे सारं काही मी टिपत होतो.
माझ्यासाठी हे सारं नवीन होतं,कारण इतका मोठा आणि इतका चांगला मित्रपरिवार मला प्रथमच लाभला.
मी स्वतःला खूप लकी समजतो की,मी ह्या मित्रपरिवाराचा एक भाग आहे...
आणि म्हणूनच त्यांच्यामुळे सुचलेल्या ह्या कवितेसोबत हा त्यांचा फोटो.....
एक संध्याकाळ अशी....,
गजबजाटात हरवलेली ।
गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत,
हसत-खेळत घालवलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
दुःख सारे ते विसरलेली ।
सुखद साजिर्‍या क्षणांनी,
तुडूंब भरून वाहिलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
डोळ्यांमध्ये ह्या साचलेली ।
मिटूनयेत म्हणता डोळे,
ओघळून खाली ती सांडलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
खाण्या-पिण्यात गुंतलेली ।
टेर खेचत एक-मेकांची,
हास्य-विनोदात गुंगलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
रंगात सार्‍या ह्या रंगलेली ।
रंग..संगतीत मिसळून असे हे,
चित्र देखणे ते साकारलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
सरता-सरता थांबलेली ।
पुन्हा येईल का..? अशी ती,
प्रश्‍नावर..अडून ह्या राहिलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
संपूच नयेशी वाटलेली ।
संपल्यावरही मनात माझ्या,
रेंगाळत अशी ती राहिलेली ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

शनिवार, २३ एप्रिल, २०११

तुझी आठवण येते....


तुझी आठवण येते....
कितीही विसरावं असं म्हणालो तरी,
का... कुणास ठाऊक पण...।
तुझी आठवण येते....

एकट्यानेच चालताना वाटेवरूनही,
तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर,
आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

कुठून तरी एखादा आवाज कानी येतो
खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो,
आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

धावता-धावता ही नजर कुठेतरी खिळते
कुणालातरी पाहून ती क्षणभर थांबते,
तू नसल्याची खूण पटेस्तोवर ती-त्या कुणाचा पाठलाग करत जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

नव्या-नव्या वाटसरुंशी गाठ-भेट होते
त्यांच्यात माझी नजर तुलाच शोधू पाहते,
आणि कुणात तरी मला तुझी झलक दिसून जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

कुणाशी तरी बोलता-बोलता गाडी रुळावरून घसरते
जुन्याच स्टेशनांवर जाऊन ती..पुन्हा एकदा बिघडते,
गप्पा-टप्पांच्या मैफिलीत मग आठवणींची उजळणी होते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

रविवार, १० एप्रिल, २०११

का केली मैत्री ही अशी...?खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते ।
कारण....
कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो ।


हर्षद अ.प्रभुदेसाई....

रविवार, २७ मार्च, २०११

फुलपाखरू माझ्या मनीचे....


मन माझे जणू एक फुलपाखरूच होते..,
असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीत होते ।

इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले,
की त्या फुलावरी जाऊनी मग ते.. विराजमान झाले ।

घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले,
आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले ।

इतक्यात कुणीतरी येऊनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले,
विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले ।

खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारे ते मोडूनी गेले,
भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुले ते कधीच नव्हते ।

हे सारे कळल्या वर मग ते.. सैरा-वैरा ऊडू लागले,
फुटल्या वाटी जाऊनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले ।

वणवण फिरले शोधूनी थकले.. हताश होवोनी माघारी फिरले,
फिरता मागे सोबत अपुल्या ते.. आठवणींना घेऊनी आले ।

आठवणी त्या सुखद क्षणांच्या.. जिवापाड ते जपू लागले,
देऊनी बगल मग वास्तवास ते.. गेल्या क्षणांतच जगू लागले ।

ह्या सार्‍यातुनी हेच उमगले.. फुलावरी लाऊनी जीव ते चुकले,
जाता-जाता अखेर फ़ूल ते.. पाखराचा... जीवच घेऊनी गेले... ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

शुक्रवार, १८ मार्च, २०११

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?.......

तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
मनाने मनावर केलेलं प्रेम....
की नजरेचं सौंदर्यावर असलेलं प्रेम हे प्रेम असतं ?

खर पाहता प्रत्येक जण प्रेमात,
ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो ।
प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त...
दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो ।तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
आईने-मुलावर,नवर्‍याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेलं प्रेम....
की माणसाने माणसावर केलेलं प्रेम हे प्रेम असतं ?

खर पाहता प्रेमात नात्याला फारसं महत्व नसतं ।
कारण प्रेमाच्या ओलाव्याने नातं फुलत असतं...
पण नातं असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच असं काही नसतं ।तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने,
अथवा तिची जागा दुसर्‍या कुणीतरी घेतल्याने..
तिच्यावर असलेल प्रेम का कमी होत असतं ?

माझ्यामते तरी तिच्या असण्याने वा नसण्याने,
असलेलं प्रेम कमी-जास्त होत नसतं ।
प्रेम असेल जर का तिच्यावर मनापासून तर...
तिच्या नसण्यातही असण्याचा आभास ते निर्माण करत असतं ।

तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....हर्षद अ. प्रभुदेसाई.....

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

आयुष्य एक रंगभूमी....


आयुष्याच्या ह्या रंगभूमीवरचे,
आपण जणू एक कलाकारच असतो ।
आपापल्या परीने प्रत्येक जण,
आपापली भूमिका ती बजावत असतो ।

प्रत्येक दिवस तो नवा प्रयोग ह्या,
रंगमंचावर मांडत असतो ।
असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे,
आपण येथे साकारत असतो ।

कुणास जमतो-कुणास न जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो ।
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभा र्‍हावाच लागतो ।

कितीही लांबला जरी खेळ हा तरी तो,
शेवट त्याचा अपुल्या हातीच नसतो ।
खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे,
ह्या परी कोणता मग मार्गच नसतो ।

ह्या खेळाचा सूत्रधार तो,
एकमेव हा देवच असतो ।
आपण फक्त जणु ताबेदार ते,
हुकूमावर त्याच्या नाचत असतो ।

तोच ठरवितो अपुली भूमिका,
अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो ।
शेवटी देऊनी वृद्धपणा तो,
अपुली रजाही मानुनी घेतो ।


हर्षद अ. प्रभुदेसाई......

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

असे कुणीतरी यावे.....


असे कुणीतरी यावे,
जिच्यात आपण हरवूनी जावे ।
शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला,
तिचेच दर्शन व्हावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

ओठांतले ते शब्द तिने मग,
अलगद झेलुनी घ्यावे ।
अबोल अशा ह्या डोळ्यांतले ते,
भाव समजोनी जावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

मौन धरिले तिनेच जर का,
मी अस्वस्थ असावे ।
अशा क्षणी मग बोलुनी काही,
मौन तिने सोडावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

बोल लाविले तिला कुणी तर,
घाव मलाच मिळावे ।
घाव लागता अंगी माझ्या,
आई गं... असे तिने म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

वाद जाहले अमुच्यात तरी मग,
मीच मला रोखावे ।
माझी असो वा तिची चूक ती,
मीच ‘सॊरी’ म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

हरलो जरी मी भांडणात तिच्याशी,
तिने हसत जिंकावे ।
हसू पाहता तिचे असे ते,
मी नेहमीच हरावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

हे असेच कुणीतरी आले तर मग,
स्वप्न कशास म्हणावे ।
स्वप्न उतरिले सत्यातच जर का,
सत्य ते फसवे नसावे......।
हे असे कुणीतरी यावे.....हर्षद अ. प्रभुदेसाई...

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

शब्दांचे खेळ....किती सोपं असतं नाही
शब्दांचे असे हे खेळ करणं,
भावनांच्या गुंत्यात गुंतवून
ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं ।

पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द
काही-ना-काही अर्थ घेऊन पडतात,
थोडीशी जागा चुकली तर मात्र
हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात ।

पण चुकल्या वाक्यांतील ते शब्ददेखील

काही-ना-काही सांगत असतात,
चुकीचीच का असेनात.. पण आपापली मते
ते ठामपणे मांडत असतात ।

वाक्यातील हे शब्दच कधी-कधी
वाक्यातील मर्म बनून जातात,
हसवता-हसवता नकळतच
डोळ्यातून ते पाणी काढून जातात ।

असेच असतात हे शब्द
जे वाक्यांना आधार देऊन जातात,
कसेही फिरविले तरी.. प्रत्येकासमोर
ते काही-ना-काही मांडून जातात ।

वाक्यांतील शब्दांचे हे खेळ
प्रत्येकाकडून खेळले जात असतात,
निरर्थक वाक्यांतून अर्थपूर्ण शब्दांचे शोध
नेहमीच घेतले जात असतात ।


हर्षद अ. प्रभुदेसाई....

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

कविता...


कविता कराव्या लागत नाहीत,
त्या नकळतच होत असतात ।
मनातल्या भावनांना जसे,
शब्दांचे आधार मिळत असतात ।
जुळवायचीच म्हणून,
वाक्यांतील यमके जुळवायची नसतात ।
वरच्या ओळींची खालच्या ओळींशी,
ओढून ताणून नाती जोडायची नसतात ।
सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या,
कवितेतून ह्या मांडायच्या असतात ।
शब्द असतात भावनांसाठी कवितेत,
भावना शब्दांसाठी नसतात ।


हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)