सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

आयुष्य एक रंगभूमी....


आयुष्याच्या ह्या रंगभूमीवरचे,
आपण जणू एक कलाकारच असतो ।
आपापल्या परीने प्रत्येक जण,
आपापली भूमिका ती बजावत असतो ।

प्रत्येक दिवस तो नवा प्रयोग ह्या,
रंगमंचावर मांडत असतो ।
असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे,
आपण येथे साकारत असतो ।

कुणास जमतो-कुणास न जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो ।
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभा र्‍हावाच लागतो ।

कितीही लांबला जरी खेळ हा तरी तो,
शेवट त्याचा अपुल्या हातीच नसतो ।
खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे,
ह्या परी कोणता मग मार्गच नसतो ।

ह्या खेळाचा सूत्रधार तो,
एकमेव हा देवच असतो ।
आपण फक्त जणु ताबेदार ते,
हुकूमावर त्याच्या नाचत असतो ।

तोच ठरवितो अपुली भूमिका,
अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो ।
शेवटी देऊनी वृद्धपणा तो,
अपुली रजाही मानुनी घेतो ।


हर्षद अ. प्रभुदेसाई......

1 टिप्पणी: