रविवार, २७ मार्च, २०११

फुलपाखरू माझ्या मनीचे....


मन माझे जणू एक फुलपाखरूच होते..,
असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीत होते ।

इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले,
की त्या फुलावरी जाऊनी मग ते.. विराजमान झाले ।

घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले,
आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले ।

इतक्यात कुणीतरी येऊनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले,
विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले ।

खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारे ते मोडूनी गेले,
भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुले ते कधीच नव्हते ।

हे सारे कळल्या वर मग ते.. सैरा-वैरा ऊडू लागले,
फुटल्या वाटी जाऊनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले ।

वणवण फिरले शोधूनी थकले.. हताश होवोनी माघारी फिरले,
फिरता मागे सोबत अपुल्या ते.. आठवणींना घेऊनी आले ।

आठवणी त्या सुखद क्षणांच्या.. जिवापाड ते जपू लागले,
देऊनी बगल मग वास्तवास ते.. गेल्या क्षणांतच जगू लागले ।

ह्या सार्‍यातुनी हेच उमगले.. फुलावरी लाऊनी जीव ते चुकले,
जाता-जाता अखेर फ़ूल ते.. पाखराचा... जीवच घेऊनी गेले... ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

शुक्रवार, १८ मार्च, २०११

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?.......

तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
मनाने मनावर केलेलं प्रेम....
की नजरेचं सौंदर्यावर असलेलं प्रेम हे प्रेम असतं ?

खर पाहता प्रत्येक जण प्रेमात,
ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो ।
प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त...
दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो ।तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
आईने-मुलावर,नवर्‍याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेलं प्रेम....
की माणसाने माणसावर केलेलं प्रेम हे प्रेम असतं ?

खर पाहता प्रेमात नात्याला फारसं महत्व नसतं ।
कारण प्रेमाच्या ओलाव्याने नातं फुलत असतं...
पण नातं असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच असं काही नसतं ।तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने,
अथवा तिची जागा दुसर्‍या कुणीतरी घेतल्याने..
तिच्यावर असलेल प्रेम का कमी होत असतं ?

माझ्यामते तरी तिच्या असण्याने वा नसण्याने,
असलेलं प्रेम कमी-जास्त होत नसतं ।
प्रेम असेल जर का तिच्यावर मनापासून तर...
तिच्या नसण्यातही असण्याचा आभास ते निर्माण करत असतं ।

तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....हर्षद अ. प्रभुदेसाई.....