रविवार, २७ मार्च, २०११

फुलपाखरू माझ्या मनीचे....


मन माझे जणू एक फुलपाखरूच होते..,
असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीत होते ।

इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले,
की त्या फुलावरी जाऊनी मग ते.. विराजमान झाले ।

घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले,
आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले ।

इतक्यात कुणीतरी येऊनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले,
विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले ।

खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारे ते मोडूनी गेले,
भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुले ते कधीच नव्हते ।

हे सारे कळल्या वर मग ते.. सैरा-वैरा ऊडू लागले,
फुटल्या वाटी जाऊनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले ।

वणवण फिरले शोधूनी थकले.. हताश होवोनी माघारी फिरले,
फिरता मागे सोबत अपुल्या ते.. आठवणींना घेऊनी आले ।

आठवणी त्या सुखद क्षणांच्या.. जिवापाड ते जपू लागले,
देऊनी बगल मग वास्तवास ते.. गेल्या क्षणांतच जगू लागले ।

ह्या सार्‍यातुनी हेच उमगले.. फुलावरी लाऊनी जीव ते चुकले,
जाता-जाता अखेर फ़ूल ते.. पाखराचा... जीवच घेऊनी गेले... ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा