शनिवार, २३ एप्रिल, २०११

तुझी आठवण येते....


तुझी आठवण येते....
कितीही विसरावं असं म्हणालो तरी,
का... कुणास ठाऊक पण...।
तुझी आठवण येते....

एकट्यानेच चालताना वाटेवरूनही,
तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर,
आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

कुठून तरी एखादा आवाज कानी येतो
खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो,
आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

धावता-धावता ही नजर कुठेतरी खिळते
कुणालातरी पाहून ती क्षणभर थांबते,
तू नसल्याची खूण पटेस्तोवर ती-त्या कुणाचा पाठलाग करत जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

नव्या-नव्या वाटसरुंशी गाठ-भेट होते
त्यांच्यात माझी नजर तुलाच शोधू पाहते,
आणि कुणात तरी मला तुझी झलक दिसून जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

कुणाशी तरी बोलता-बोलता गाडी रुळावरून घसरते
जुन्याच स्टेशनांवर जाऊन ती..पुन्हा एकदा बिघडते,
गप्पा-टप्पांच्या मैफिलीत मग आठवणींची उजळणी होते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा