सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

आयुष्य एक रंगभूमी....


आयुष्याच्या ह्या रंगभूमीवरचे,
आपण जणू एक कलाकारच असतो ।
आपापल्या परीने प्रत्येक जण,
आपापली भूमिका ती बजावत असतो ।

प्रत्येक दिवस तो नवा प्रयोग ह्या,
रंगमंचावर मांडत असतो ।
असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे,
आपण येथे साकारत असतो ।

कुणास जमतो-कुणास न जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो ।
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभा र्‍हावाच लागतो ।

कितीही लांबला जरी खेळ हा तरी तो,
शेवट त्याचा अपुल्या हातीच नसतो ।
खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे,
ह्या परी कोणता मग मार्गच नसतो ।

ह्या खेळाचा सूत्रधार तो,
एकमेव हा देवच असतो ।
आपण फक्त जणु ताबेदार ते,
हुकूमावर त्याच्या नाचत असतो ।

तोच ठरवितो अपुली भूमिका,
अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो ।
शेवटी देऊनी वृद्धपणा तो,
अपुली रजाही मानुनी घेतो ।


हर्षद अ. प्रभुदेसाई......

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

असे कुणीतरी यावे.....


असे कुणीतरी यावे,
जिच्यात आपण हरवूनी जावे ।
शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला,
तिचेच दर्शन व्हावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

ओठांतले ते शब्द तिने मग,
अलगद झेलुनी घ्यावे ।
अबोल अशा ह्या डोळ्यांतले ते,
भाव समजोनी जावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

मौन धरिले तिनेच जर का,
मी अस्वस्थ असावे ।
अशा क्षणी मग बोलुनी काही,
मौन तिने सोडावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

बोल लाविले तिला कुणी तर,
घाव मलाच मिळावे ।
घाव लागता अंगी माझ्या,
आई गं... असे तिने म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

वाद जाहले अमुच्यात तरी मग,
मीच मला रोखावे ।
माझी असो वा तिची चूक ती,
मीच ‘सॊरी’ म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

हरलो जरी मी भांडणात तिच्याशी,
तिने हसत जिंकावे ।
हसू पाहता तिचे असे ते,
मी नेहमीच हरावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

हे असेच कुणीतरी आले तर मग,
स्वप्न कशास म्हणावे ।
स्वप्न उतरिले सत्यातच जर का,
सत्य ते फसवे नसावे......।
हे असे कुणीतरी यावे.....



हर्षद अ. प्रभुदेसाई...

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

शब्दांचे खेळ....



किती सोपं असतं नाही
शब्दांचे असे हे खेळ करणं,
भावनांच्या गुंत्यात गुंतवून
ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं ।

पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द
काही-ना-काही अर्थ घेऊन पडतात,
थोडीशी जागा चुकली तर मात्र
हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात ।

पण चुकल्या वाक्यांतील ते शब्ददेखील

काही-ना-काही सांगत असतात,
चुकीचीच का असेनात.. पण आपापली मते
ते ठामपणे मांडत असतात ।

वाक्यातील हे शब्दच कधी-कधी
वाक्यातील मर्म बनून जातात,
हसवता-हसवता नकळतच
डोळ्यातून ते पाणी काढून जातात ।

असेच असतात हे शब्द
जे वाक्यांना आधार देऊन जातात,
कसेही फिरविले तरी.. प्रत्येकासमोर
ते काही-ना-काही मांडून जातात ।

वाक्यांतील शब्दांचे हे खेळ
प्रत्येकाकडून खेळले जात असतात,
निरर्थक वाक्यांतून अर्थपूर्ण शब्दांचे शोध
नेहमीच घेतले जात असतात ।


हर्षद अ. प्रभुदेसाई....